लाॅकडाऊन कारवाईसाठी नव्हे तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:32 AM2021-04-16T04:32:27+5:302021-04-16T04:32:27+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात केले.
जिल्हा प्रशासनाच्या लाॅकडाऊनच्या भूमिकेबाबत लोकांना माहिती व्हावी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधला. नागरिकांनीसुद्धा या फेसबुक लाइव्हला प्रतिसाद देत विविध प्रश्न या तिन्ही अधिकाऱ्यांना विचारले. लाॅकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी सुरू आहेत, कोणत्या बंद आहेत, लसीकरण, टेस्ट, जिल्हाबंदी, अनेक व्यावसायिकांनी आपले नुकसान होत असल्याने व्यवसाय सुरू ठेवावा का, असेही प्रश्न विचारले. तसेच काहींनी ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या घरी जाऊन लसीकरण करता येईल का, शेतीच्या कामांसाठी खासगी गाडी वापरता येईल का, असे असंख्य प्रश्न विचारून जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडून त्याचे निरसन करून घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरीही जिल्हा महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेवटच्या क्रमांकावर आहे. सक्रिय रुग्णांपैकी साठ टक्के रुग्णांना लक्षण नाहीत. त्यामुळे ही साथ अशीच आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सद्य:परिस्थिती पाहता या लाॅकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले. या तिघांनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत माहिती देतानाच प्रशासन कोरोना लढ्यासाठी सक्रियपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली.
या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अडीच हजार लोकांनी कलेक्टर पेजला भेट दिली, तर ३५० लोकांनी कमेंटस दिल्या.