विहार तेंडुलकर
रत्नागिरी : अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या दरबारी गेली चार वर्षे झगडावे लागत आहे. मराठी राज्यकर्त्यांसह सर्वच स्तरावर उदासिनता असल्याने आवश्यक ते सर्व लिखित पुरावे देऊनही मराठी भाषेच्या पदरी निराशाच आली आहे. मराठी राजभाषा दिन साजरा करताना तरी अभिजात भाषेच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावासाठी सारेजण एकदिल होणार का? असा सवाल आता उमटू लागला आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेला अहवाल महाराष्ट्र शासनाने पाच वर्षांपूर्वी केंद्र शासनाला सादर केला आहे. त्यानंतर केंद्र शासनाने हा अहवाल साहित्य अकादमीकडे तपासणीसाठी पाठवला.
यादरम्यान या अहवालाचे इंग्रजीतही भाषांतर करण्यात आले. ४३६ पानांचा हा अहवाल आहे. यामध्ये मराठी भाषेच्या प्राचीनतेचे, लोकप्रियतेचे, अखंडतेचे दाखले देण्यात आले आहेत. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी साहित्य अकादमीच्या भाषा समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी लेखी शिफारस केली. आता केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे हा अहवाल पडून आहे.विशेष म्हणजे, मराठीला अभिजातपणाचा दर्जा मिळावा, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले. मात्र, ते महाराष्ट्र स्तरावरच झाले. त्याची साधी हवादेखील केंद्र शासनापर्यंत न पोहोचल्याने अभिजात भाषांच्या यादीत मराठीचा अजूनही समावेश झालेला नाही. दरवर्षी मराठी राजभाषा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होतो, त्यापलिकडे या दिनाचे महत्व मराठी भाषिकांसाठी आजतरी राहिलेले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.अभिजात भाषेसाठी कोणते निकष?कोणतीही भाषा अभिजात म्हणून जाहीर करण्यासाठी चार निकष ठरवण्यात आले आहेत. भाषा दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी, ह भाषा अखंडपणे बोलली गेली पाहिजे, भाषेत अभिजात ग्रंथ असावेत, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रुप यांची सांगड घातली गेली पाहिजे, हे ते निकष आहेत.या भाषांना अभिजात भाषेचा दर्जाभारतात सर्वप्रथम तामिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ते साल होते २००४! त्यानंतर संस्कृतला २००५ साली, तेलगू व कन्नडला २००८ साली, मल्याळम्ला २०१३ साली तर ओडियाला २०१४ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.मराठी अभिजात भाषा झाली तर...कोणतीही भाषा अभिजात म्हणून केंद्र शासनाने जाहीर केली तर त्या भाषेच्या अभिवृध्दीसाठी शासन सुमारे तीनशे ते पाचशे कोटींचे अनुदान देते. त्या अनुदानातून भाषेच्या संवर्धन अन् अभिवृध्दीसाठी प्रयत्न केले जातात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने २०१३मध्ये आपला अहवाल शासनाला दिला. या अहवालाचे नंतर इंग्रजीतही भाषांतर करण्यात आले. हा अहवाल सध्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे पडून आहे. गेली चार वर्षे तो तसाच पडून आहे. राजकीय इच्छाशक्ती कमी असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासाठी झगडावे लागत आहे.-डॉ. सुधीर देवरे,भाषा अभ्यासक, सटाणा, नाशिक
अहवालातील महत्वाच्या बाबी...मराठी भाषा अनेक बोलीभाषांनी समृध्द आहे. या भाषेत एकूण ५२ बोलीभाषा आहेत. त्यापैकी वैदर्भी, कोकणी, ऐरणी, मालवणी, कोल्हापुरी या त्यातील काही विशेष बोलीभाषा आहेत. सध्या जगभरात नव्वद दशलक्ष एवढी लोकसंख्या मराठी भाषा बोलते. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. यातील पाच हजारपेक्षा जास्त ग्रंथ हे जागतिक स्तरावर गुणवत्तापूर्ण आहेत.