खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खोपी फाट्यानजीक ट्रेलरला धडक देत चालकाला शिवीगाळ व मारहाण करत २२ हजार रुपये किंमतीचा अपोलो कंपनीच्या टायरचोरीचा येथील पोलिसांना छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी खासगी बस चालक कातकर यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा टेलर साहित्य घेऊन गुजरातहून गोव्याच्या दिशेने जात होता. खोपी फाट्यानजीक चालकाने विश्रांतीसाठी रस्त्याकडेला ट्रेलर उभा केला होता. याच दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या खासगी बस चालक कातकर याच्या बसची ट्रेलरला धडक बसली. यानंतर, बस चालकाने ट्रेलर चालकालाच शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत तक्रार करण्यासाठी टेलर चालक पोलीस स्थानकात आला असता, ट्रेलरच्या पाठीमागे बांधून ठेवलेला २२ हजार रुपये किमतीचा टायर चोरून नेत तो गोव्याच्या दिशेने निघून गेला. याबाबत पोलीस निरीक्षक निशा
जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नरेंद्र चव्हाण व प्रदीप म्हस्के हे तपास करत हाेते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व खासगी बसेसची तपासणी केली असता चोरलेला टायर आढळला. या प्रकरणी अटक केलेल्या बस चालक कातकर यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.