वन्यप्राण्याचे हल्ले; रत्नागिरी जिल्ह्यात जखमींना मिळाली 'इतक्या' कोटीची भरपाई

By संदीप बांद्रे | Published: December 6, 2024 06:15 PM2024-12-06T18:15:58+5:302024-12-06T18:16:16+5:30

संदीप बांद्रे चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा ...

One crore compensation in Ratnagiri district in 4 years to those injured in wild animal attacks | वन्यप्राण्याचे हल्ले; रत्नागिरी जिल्ह्यात जखमींना मिळाली 'इतक्या' कोटीची भरपाई

वन्यप्राण्याचे हल्ले; रत्नागिरी जिल्ह्यात जखमींना मिळाली 'इतक्या' कोटीची भरपाई

संदीप बांद्रे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण गंभीर जखमी, तर एकजण किरकोळ जखमी झाला. यातील मृतांच्या नातेवाइकांना आतापर्यंत ९८ लाख १५ हजार ४४५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड या वन्यप्राण्यांच्या व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र रानगाव, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात सह्याद्री खोऱ्याच्या पायथ्याला असलेल्या गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली कायम दिसून येतात. विशेषत: बिबट्या, रानडुक्कर, रानगवा, माकड या प्राण्यांचा संचार अधिक वाढला आहे. यामध्ये एखाद्यावेळी मानवी हस्तक्षेप घडल्यास त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याचे प्रकार घडतात.
बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ कोंबडी, कुत्री खाण्याच्या उद्देशाने होत असल्याने त्यातून काहींवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत.

मात्र बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असले तरी त्यात कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्याउलट रानगवा, रानडुक्कर, अस्वल यांच्या हल्ल्यात काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०२२-२३ मध्ये सतीश शांताराम जाधव (फुरूस), भिकाजी राघू माडवकर (माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (तळसर, चिपळूण) यांच्यावरही रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरुण रेडीज यांचा रानडुकराच्या हल्ल्यात (चांदेराई, रत्नागिरी) मृत्यू झाला होता. त्यातील काहींना २० लाख तर काहींना १५ लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली होती. या व्यतिरिक्त गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.

सह्याद्री खोऱ्यातील तळसर चिपळूण, पातेपिलवलीतर्फे वेळंब, शेवरवाडी नांदगाव, खानू नवीवाडी लांजा, तसेच फुरूस, पन्हाळकाजी दापोली, चिंचघर खेड, चांदेराई रत्नागिरी, दोडवली गुहागर, ताडील दापोली, साखरपा संगमेश्वर, पाथरट रत्नागिरी आदी ठिकाणी वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

वन्यप्राण्यांकडून मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय सहजासहजी हल्ला होत नाही. तरीदेखील काही गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसून आल्या, तर तत्काळ वन विभागाशी संपर्क साधवा. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असलेल्या सेवेची ग्रामस्थांनी मदत घ्यावी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी यंत्रणा दाखल केली जाईल. - गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

Web Title: One crore compensation in Ratnagiri district in 4 years to those injured in wild animal attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.