रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. खेड नगरपरिषदेच्या २५ बेडच्या रुग्णालयाला मान्यता देण्यात येणार असून, लोटे उद्योग भवन येथे कोरोना रुग्णालय सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी कोरोना लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव, रमेश कीर, बशीर मुर्तुझा उपस्थित होते.
या बैठकीत सर्वानुमते झालेल्या निर्णयाची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
रुग्णालयांसाठी एनएचएम व जीएनएम नर्सेसची आवश्यकता आहे. यश फाऊंडेशन नर्सिंग महाविद्यालयातील ४० विद्यार्थिनी लवकरच रुजू होणार आहेत. खेड, दापोली नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी त्या-त्या ठिकाणी हजर होणार आहेत. शिवाय परकार येथील विद्यार्थिनी परकार रुग्णालयात सेवा बजावणार आहेत. वालावलकर रुग्णालयाच्या दहा एमबीबीएस डॉक्टरांना रुजू करून घेण्यात येणार असून, त्यांना २५ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम पुन्हा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या विद्यमाने राबविली जाणार आहे. कोरोनामुळे रत्नागिरी शहर व आजुबाजूच्या परिसरात काही रुग्णालये मान्यता न घेता सुरू करण्यात आली आहेत. त्यांनी प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाही मोफत लस दिली जाणार असून, जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेबाबत येत्या दोन दिवसात नियोजन करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील ऑक्सिजन प्लॅन्ट येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. मात्र रायपाटण, कळंबणी, कामथे येथील नियोजित ऑक्सिजन प्लॅन्ट महिनाभरात सुरू होतील. नवीन व्हेंटिलेटर व बायपेप मशीन लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय जिल्ह्यासाठी कार्डियाकसह एकूण १३ रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
आयसीयु बेड उपलब्धता
आजच्या तारखेला तीन आयसीयु बेड शिल्लक आहेत. ते बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियोजनमधून २० व्हेंटिलेटरना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय १३ रुग्णवाहिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय व्हेंटिलेटरपूर्वी लागणाऱ्या ५० बायपेप मशीन घेण्यात येणार आहेत.
रेल्वेतून प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. चाचणीनंतर प्रवाशांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. शिक्के मारलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याबाबत सूचना केल्या जाणार आहेत. जनतेने कोरोना नियमांचे पालन करावे.
कोरोना चाचणीसाठी खासगी कंपन्यांना त्यांची स्वत:ची यंत्रणा उभी करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.