रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली असली तरी आता निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. विशेष म्हणजे आयोगाने सुरू केलेल्या व्होटर हेल्प लाईन किंवा (nvcp.in) संकेतस्थळावरूनही स्वत: मतदाराला घरच्या घरी बसून मोबाईलद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे शक्य झाले आहे. याद्वारे मतदार यादीत दुरूस्तीही करता येणे शक्य झाले आहे.दुबार मतदान होऊ नये, त्याचबरोबर विविध प्रकारच्या दुरूस्ती करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने सध्या मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत सध्या बीएलओ मतदाराच्या घरी जाऊन त्याची खरी माहिती घेत आहेत. तसेच नाव, वय, फोटो, लिंग, पत्ता, मृत्यू झाल्यास त्याची नोंद आदी दुरूस्ती करणे, हे या पडताळणी कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी मतदारांनाही घरच्या घरी पडताळणी किंवा दुरूस्ती करता यावी, यासाठी आयोगाने व्होटर हेल्प लाईन हे अँड्रॉईड अॅप्लीकेशन तयार केले आहे.त्याचबरोबर (nvcp.in) या संकेतस्थळावरूनही दुरूस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या सुविधांच्या माध्यमातून अगदी घरबसल्या १८ वर्षे झालेल्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. अथवा मृत्यू झालेल्या सदस्याचे नाव वगळता येणार आहे. नाव, वय, फोटो, लिंग, पत्ता यातही दुरूस्ती करता येणार आहे. या दोन सुविधाव्यतिरिक्त ह्यसिटीझन सर्व्हिस सेंटरह्णच्या माध्यमातूनही पडताळणी अथवा दुरूस्ती करता येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघात आतापर्यंत एकूण ११,३८४ मतदारांची पडताळणी झाली असून, यापैकी बीएलओंमार्फत १०,६३२ मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे.मतदारांकडून ऑनलाईन झालेली पडताळणी
- व्होटर हेल्प लाईन : ४०२
- संकेतस्थळवरून (nvcp.in) पडताळणी : ३२२
- सिटीझन सर्व्हिस सेंटर (सी. एस. सी.) : २०
बहुतांश माहिती योग्यचपडताळणीच्या एकूण ११,३८४ अर्जांपैकी ९६१६ मतदारांची माहिती बिनचूक आहे. उर्वरित १७६८ मतदारांच्या माहितीत दुरूस्ती करावयाची होती. त्यासाठी १६०२ अर्ज दुरूस्तीसाठी आलेले आहेत. नावात सुधारणा करण्यासाठी ४१७, वडील, पतीचे नाव बदलणे २६३, नात्यात बदल ९४, फोटो बदल ४४, वयात बदल ११६१ आणि लिंग बदल दुरूस्तीसाठी १५ अर्ज आले आहेत.