मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना संक्रमण वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने शासनमान्य व खासगी शाळांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. शाळा बंद असल्याने मुले घरी असली तरी ऑनलाईन अध्यापनासाठी मोबाईल, टॅब, लॅपटाॅप व त्यासाठी लागणारी इंटरनेट सेवा यांमुळे शिक्षण खर्चिक बनले असून, पालकांना मात्र आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ग्रामीण भागात नेटवर्क समस्या सातत्याने भेडसावत असल्याने दरमहा ठरावीक रकमेचे रिचार्ज करावे लागते. मात्र नेटवर्कच गायब असल्याने रिचार्ज वाया जात आहे. के.जी. ते पी.जी.पर्यंतचे अध्यापन ऑनलाईन आहे. एका घरात जर दोन किंवा तीन अपत्ये असतील व ती भिन्न वर्गांत शिकत असतील तर पालकांना मोबाईलसह इंटरनेटचा खर्च वाढला आहे. मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्जसह वायफायसाठी वेगळे रिचार्ज करावे लागत आहे. मोठ्या वर्गातील मुलांना शाळा-महाविद्यालयांसह खासगी क्लास लावावे लागल्याने लॅपटाॅपसह पुरेसा डाटा उपलब्ध व्हावा, यासाठी वायफाय सेवा घ्यावी लागते. नोकरदार पालक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले असतील तर कुटुंबाला दरमहा दीड ते दोन हजार रुपये इंटरनेट, मोबाईल रिचार्जसाठी खर्च करावे लागत आहेत.
अभ्यासासाठी मोबाईल मुलांच्या हातात आला आहे. शाळेचा तास संपला तरी मुले मोबाईलवर गेम खेळण्यात, व्हिडिओ पाहण्यात व्यस्त राहतात. त्यामुळे ठरावीक रकमेच्या रिजार्चमुळे दररोजचा डाटा ठरलेला असतो. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होत असल्याने रिजार्चसाठी जास्तीचा खर्च वाढल्याने शिक्षण खर्चिक झाले आहे.
- स्वरूप पाटील, पालक.
n गतवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन अध्यापन असल्याने अनेक पालकांना मोबाईल, टॅब, लॅपटाॅप खरेदी करावे लागले आहेत.
n ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने रिचार्जची रक्कम वाया जात आहे.
n दोन, तीन मुले असतील तर पुरेशा इंटरनेट डाटासाठी वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. अनेक वेळा इंटरनेट सेवाही कोलमडत असल्याने मुलांचे नुकसान होते.
n शाळेचे तास संपल्यानंतर अनेक मुले व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे यांमध्ये मोबाईल डाटा वाया घालवीत आहेत. मुलांना वाढत्या खर्चाचे गणित कळत नसल्याने पालकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
कोरोनामुळे घरातून अध्यापन सुरू असले तरी माझ्या दोन मुलांचे वर्ग वेगळे आहेत. मात्र वेळ एकच असल्याने मोबाईल खरेदी करावा लागला. शिकवणीचे वर्ग ऑनलाईनच सुरू आहेत. त्यामुळे ठरावीक रकमेचे रिचार्ज मारले तर डाटा पुरत नसल्याने वायफाय सेवा घेतली आहे. मुले घरातून अध्यापन करीत असली तरी शाळेची फी भरावीच लागते, इंटरनेटसाठीचाही खर्च वाढला आहे.
- जयदीप विचारे, पालक
बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन अध्यापनाचा स्वीकार करावा लागला असला तरी मुलांना आकलन कितपत होत आहे, हा एक प्रश्न आहे. मुलांच्या वर्तनात बदल झाला असून हट्टीपणा, चिडचिडेपणा वाढला आहे. आभासी मित्र वाढले असून जग इंटरनेटमुळे जवळ आले आहे. तुलनेने आठवी ते दहावीच्या मुलांचे प्रश्न वाढले आहेत. वाईट किंवा आकर्षणाकडे झुकत आहेत का, याबाबत पालकांनी दक्ष राहणे गरजे आहे. हे टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन मुलांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
- डाॅ. सचिन सारोळकर, मानसोपचारतज्ज्ञ