रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने गाड्यांना भारमान कमी हाेते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नामध्येही मोठी घट झाली आहे. इतरवेळी जिल्ह्यात एस.टी.च्या ४२०० फेऱ्या होतात. त्यातून ५० लाखांचे उत्पन्न मिळते.
जिल्ह्यात संचारबंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाळा, महाविद्यालय तसेच संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. गुरुवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने एस.टी.च्या केवळ ३४५ फेऱ्या साेडण्यात आल्या. या गाड्या दिवसभरात २९,८१६ किलोमीटर धावल्या. त्यातून ७,४५,४०० एवढे उत्पन्न मिळाले.
दापोली आगारातून २४, खेड ३३, चिपळूण ५४, गुहागर ३४, रत्नागिरी ३४, देवरूख ८, लांजा ८६, राजापूर ५०, मंडणगड २२ आगारातून फेऱ्या सुटल्या. रत्नागिरी शहरात मात्र शहर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती संचारबंदीमुळे आणखीनच खालावणार आहे. जानेवारी महिन्यापासून एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचे वेळापत्रक रुळावर येत होते. मात्र, १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या संचारबंदीमुळे त्याला खीळ बसली आहे.