रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकच अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:37 PM2024-04-13T17:37:06+5:302024-04-13T17:37:35+5:30
रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ...
रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. पहिल्याच दिवशी ७ व्यक्तींकडून १८ अर्जांची खरेदी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह असल्याने त्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. उमेदवारासह पाच व्यक्तींनाच अर्ज दाखल करण्यासाठी या दालनात येता येणार आहे.
पहिल्याच दिवशी शकील अब्दुल करीम सावंत या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल केला. यावेळी सावंत यांच्यासोबत चिपळूणचे ॲड. ओवेस पेचकर तसेच अन्य समर्थक उपस्थित होते.
अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.