लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ज्या भागात कोरोनाचा फैलाव तसेच उद्रेक झाला आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे त्या त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्राचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोराेनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात वाडी-वस्तीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार, १७१७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील ४४० ॲक्टिव्ह आहेत. यातील ७३ जणांना उपचाराकरिता रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे, तर होम आयसोलेशनमध्ये ३०९ जणांना ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात रुग्णसंख्या वेगाने वाढली होती. यामध्ये बुधवारी ८३, गुरुवारी ५८ व शुक्रवारी ९९ अशी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली असल्याने सुमारे ३० पेक्षा अधिक वाड्या-वस्त्या प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुरळ बौध्दवाडी, शिंदेआंबेरी खसासेवाडी, शेंबवणे जावळेवाडी, सायले बौध्दवाडी, निगुडवाडी गुरववाडी, कोंडअसुर्डे कडवई बौध्दवाडी, हरपुडे सुतारवाडी, देवरुख सोळजाई मंदिर, दाभोळे वरचीवाडी, आंबवली मुस्लिमवाडी, आंबवली कारकरवाडी, आंगवली धनगरवाडी, भडकंबा पेठवाडी, जांभुळवाडी बौध्दवाडी. कडवई वाणीवाडी, काटवली पड्यारवाडी, तेर्ये, साडवली पातेरेवाडी, साडवली सह्याद्रीनगर, तांबेडी सनगलेवाडी, देवरुख पर्शरामवाडी, कसबा बौध्दवाडी, कोंडगाव रोहिदास आळी, कोंडगाव साखळवाडी, कोंडीवरे मोहल्ला, लोवले, रामपेठ संभाजीनगर, साखरपा हायस्कूल, साखरपा जाधववाडी, विप्रवली मालवाडी आदींचा समावेश आहे.
................................
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गावा-गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने तालुका आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ होत आहे. तालुक्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्याबरोबरच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्या गावातील वाड्यांमध्ये जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याचे कामही आरोग्य यंत्रणेकडून युध्दपातळीवर होत आहे.
.................................
देवरुख-मार्लेश्वर फाटा येथे प्रवेश बंदचा फलक लावण्यात आला आहे.