अतिवृष्टीने गिळले भात, रत्नागिरी जिल्ह्यात पन्नास टक्के शेती वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 06:12 PM2020-10-17T18:12:25+5:302020-10-17T18:13:52+5:30
farmar, rain, ratnagirinews अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.
रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे भातपीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी भातकापणीला प्रारंभ केला होता. १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपीक वाचले असले तरी उर्वरित भातपिकाचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पाऊस लांबल्याने भात कापणीला विलंब झाला. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी भात कापणी केली. मात्र, गेल्या आठवड्यात शनिवारी भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने चांगलाच चकवा दिला.
शनिवारपासून सतत पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारपर्यंत ऊन होते. मात्र, सायंकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. परिणामी कापून वाळविण्यासाठी ठेवलेले भात शेतकऱ्यांना घरी आणता आले नाही. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात नदीकाठच्या भातशेतीला चांगलाच तडाखा बसला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कापलेली शेतीच वाहून गेल्याने शेतकरी संकटात आला आहे. शिवाय काही ठिकाणी भात खाचरात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत आहे.
सोसाट्याचे वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी यामुळे तयार भात जमिनीवर आडवेतिडवे कोसळले असून, भात खाचरात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाताला अंकुर फुटले आहेत. तयार पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने कृषी विभागाला शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले क्षेत्र कमी असल्याने मक्तेदारी पध्दतीने पिके घेण्यात येतात. कष्टाने पिकविलेले धान्य पदरात येण्यापूर्वीच निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.