लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा
: काम न करता कामाचे बिल अदा केल्याने काेल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या नव्या कमिटीने या कामाच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतरही या कामाला सुरुवात केल्याने कमिटीने कामाला हरकत घेतली. त्यामुळे ठेकेदार व उपसरपंच यांच्यात वाद निर्माण झाला. अखेर हा वाद पोलीस स्थानकापर्यंत पाेहाेचला. पोलिसांनी यशस्वी तोडगा काढून वादावर पडदा टाकला आहे.
तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीने सन २०१९ मध्ये पाखाडीचे काम न करताच ठेकेदाराचे बिल अदा केल्याचे नवीन ग्रामपंचायत कमिटीच्या लक्षात आले. पाखाडीचे काम न करता कामावर खर्ची टाकल्याची चौकशी करण्याची मागणी केल्याचे समजताच संबंधित ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केली. सन २०१९चे काम आता कसे काय करता, आम्ही हे काम करू देणार नाही. आम्ही चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, असे सांगून कमिटीने काम करण्यास हरकत घेतली. त्यावर संबंधित ठेकेदाराने उपसरपंच वैष्णवी सावंत यांच्या बरोबर वाद घातला. उपसरपंच वैष्णवी सावंत यांनी पोलिसांत धाव घेतली असता ठेकेदार व उपसरपंच यांच्यात झालेल्या वादावर मध्यबिंदू काढून वादावर पडदा टाकण्यात आला आहे.
मात्र, कोल्हेवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा पध्दतीने कामे दाखवून निधी लाटण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काम न करताच हे पैसे नेमके कोणाच्या घशात गेले, असा प्रश्न सरपंच वैदेही बेंद्रे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सरपंच यांनी या कामाबाबत संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही समर्पक उत्तरे देण्यात आली नाहीत. शेवटी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा, असे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनावर सरपंच वैदेही बेंद्रे, उपसरपंच वैष्णवी सावंत, अभिजित सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------------------
कनिष्ठ अभियंत्यांनी दिला पूर्णत्त्वाचा दाखला
कोल्हेवाडी गावातील रवींद्र सावंत ते गणपती विसर्जन वाटेचे पाखाडीचे काम २०१८-१९ या वर्षात करण्यात आल्याचे दाखवून काम न करताच ३६,६०० रुपये ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले. या कामाचा पूर्णत्त्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याने दिला आहे. एवढेच नव्हे तर लेखापरीक्षणही करण्यात आले आहे. हा प्रकार नव्या ग्रामपंचायत कमिटीच्या लक्षात आल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.