जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:36+5:302021-05-21T04:33:36+5:30

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, ...

Panchnama of five hundred hectare area in the district completed | जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Next

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बागायतीचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यातील आंबा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांची आंबे, काजू, नारळ, सुपारी, फणसाची झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

सागरी किनारपट्टी लगतच्या गावात वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. ग्रामीण तसेच शहरी भागातील झाडे कोसळली. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने विजेचे खांब, वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यापूर्वीच वादळाचे भक्ष्य बनला. नारळ, काजू, फणस, सुपारीची झाडेही वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार अडीच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. गावागावांत कृषी सहायक, पर्यवेक्षक, अधिकारी पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ४१० शेतकऱ्यांचे २३५ हेक्टर क्षेत्र वादळामुळे बाधित झाल्याचे पंचनाम्यात आढळले आहे. उर्वरित तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनाम्याचे काम सुरू आहे.

...................

राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली तालुक्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या पाच-सहा दिवसांत वादळग्रस्त तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.

Web Title: Panchnama of five hundred hectare area in the district completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.