रत्नागिरी : भारत सरकार आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२४’ स्पर्धा तामिळनाडू येथे आयाेजित करण्यात आली आहे. यातील खो-खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज रमेश चवंडे यांची निवड करण्यात आली आहे.खेलो इंडिया युथ गेम्समध्ये खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून राज्यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची निवड झाली आहे. दुसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्येही महाराष्ट्र संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झाला होता. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून पंकज यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.तामिळनाडू येथे दि. १९ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे पंकज प्रशिक्षक असतील. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डाॅ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, माजी सचिव संदीप तावडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र खो-खो संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे पंकज चवंडे
By मेहरून नाकाडे | Published: January 19, 2024 6:20 PM