जिल्ह्यातील २० शिवभोजन गृहांमधून मिळणार पार्सल सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:00+5:302021-04-09T04:33:00+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने मिनी लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी सुरू आहे. ...
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने मिनी लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी सुरू आहे. संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील २० शिवभोजन केंद्रांमध्ये ३० एप्रिलपर्यंत पार्सल सुविधेद्वारे जेवण देण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.
शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा विभागाकडे तसे आदेश बुधवारी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत नागरिकांना शिवभोजन केंद्रात बसून घेता येणार नाही. केंद्रात येणारे ग्राहक आणि या केंद्रातील कर्मचारी यांना मास्क वापरणे सक्तीचे आहे. तसेच केंद्रावर योग्य अंतराचे कसोशीने पालन करावे लागणार आहे. शिवभोजन तयार करणाऱ्या आणि वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारंवार हात धुणे बंधनकारक असून शिवभोजन केंद्राचे निर्जंतुकीकरण दररोज करावे लागणार आहे.
रोजंदारीवर काम करणारे मजूर, शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामान्य जनतेला अल्प दरात भोजन सुविधा मिळावी, या हेतूने शासनाने शिवभोजन थाळी सुविधा ५ रुपयांत उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात २२ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी सध्या खेड आणि दापोली येथील दोन केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे सध्या २० केंद्रांवर शिवभोजन सुविधा सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने संसर्ग टाळण्यासाठी शासनाने आता शिवभोजन थाळी केंद्रात घेण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी आता या केंद्रांमधून पार्सल सुविधेद्वारे या भोजनाचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेताना पार्सल सुविधेचा अवलंब करावा. तसेच हा लाभ घेताना मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुशांत बनसोडे यांनी केले आहे.