चिपळूण : चिपळूण - कराड मार्गावरील बहादूर शेख नाका ते पिंपळी बुद्रूक यादरम्यान रस्त्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले आहे. या मार्गावर विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांमुळे किरकोळ अपघात झाले. अर्धवट रस्त्यावरून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कंपनीला धारेवर धरले होते. त्यामुळे कंपनीकडून आता अर्धवट रस्ते पूर्ण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून, हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जात आहे. चिपळुणात बहादूर शेख नाका ते पिंपळी दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला. खेर्डी, पिंपळी व सती येथे जोडरस्त्याची कामे रखडली होती. त्यावरून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीवर हल्लाबोल केला होता. कंपनीच्या चुकीमुळे अनेक वाहनचालक अपघातांत जायबंदी झाले. उपचाराचा नाहक खर्च करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. कंपनीच्या सर्व गाड्या रोखल्यानंतर कंपनीचे भागीदार शिवाजी माने, सदाशिव माने तत्काळ घटनास्थळी हजर झाले. नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल झाडाझडती घेतली असता सर्व ठिकाणी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पेढांबे ब्रिज, काळकाई मंदिर कॅनॉल, खेर्डी अशा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने त्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.