राजापूर : रिफायनरी प्रकल्प व्हावा, याकरिता राजापूरवासीय टाहो फोडत असताना शिवसेना नेते अंतर्गत गटातटाच्या राजकारणात व्यस्त आहेत. राजापूरच्या, पर्यायाने कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हे घातक असून, आता तालुक्यातील सर्व जनतेने या प्रकल्पासाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे आणि सर्व पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यांना साथ दिली पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंदुभाई देशपांडे आणि काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये यांनी केले.रिफायनरी प्रकल्पाला समर्थन वाढत असताना येथील जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राजापुरातील सुमारे ४५ संस्थांची मिळून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून भेटीसाठी वेळ मागण्यात आली आहे. गत महिन्यात राजापुरात आलेले पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनाही निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी समर्थकांना मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार करा, मुख्यमंत्री नक्की भेट देतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, महिना-दीड महिना होऊनही मुख्यमंत्री कार्यालयाकडून समन्वय समितीच्या पत्रांना कोणतेच उत्तर मिळालेले नाही, असे यावेळी सांगण्यात आले.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील या दोन ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री हे जनता आणि शासन यांच्यामधील दुवा आहेत. जनतेच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. तेच जबाबदारी टाळतात, हे आपले दुर्दैव असल्याचा टोला हरिश रोग्ये यांनी लगावला, तर या प्रश्नी आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत देशपांडे व्यक्त केले.पूर्वी मुंबईत मुबलक प्रमाणात नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कोकणात औद्योगिक प्रकल्प आणण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तोच वारसा आजपर्यंतच्या सर्व नेत्यांनी चालविला आहे. त्यामुळे कोकणातील घरे आणि शाळा बंद पडू लागल्या आहेत. मुंबई आणि पुण्याकडे जाणारा हा प्रवाह थांबवायचा असेल तर रिफायनरीसारख्या औद्योगिक प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे या द्वयींनी सांगितले.कोकणात प्रकल्प आल्यानंतर काही पर्यावरणवादी संस्था येतात, येथील लोकांची डोकी भडकवतात आणि निघून जातात. येथे मोठे प्रकल्प आले तर आपल्या उद्योग, व्यवसायांना धोका पोहोचेल, या भीतीपोटी काही उद्योगपती अशा पर्यावरणवाद्यांना पुढे घालून प्रकल्पविरोधी वातावरण तयार करत असल्याचा गौप्यस्फोट देशपांडे यांनी केला. अशा संस्थांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.राजापुरातील सामाजिक, शैक्षणिक संस्था, सुशिक्षित वर्ग रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने असून, सर्व पक्षांच्या स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनीही आता जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. कोकणात औद्योगिकीकरण न झाल्यास कोकण भकास होईल, त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्पाची घोषणा करावी, असे आवाहन देशपांडे आणि रोग्ये यांनी केले.विसंगत भूमिकाशिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घ्यायची, खासदारांनी विरोध करायचा, असे राजकारण या प्रकल्पावरून सुरू आहे. राजकारणातील ही विसंगती कोकणच्या विकासाला मारक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पावरूप पक्षातच दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे यावरून दिसत आहे.
रिफायनरीसाठी जनतेचा टाहो अन् शिवसेनेचे नेते राजकारणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:47 PM
nanar refinery project Ratnagiri- रिफायनरी प्रकल्प व्हावा, याकरिता राजापूरवासीय टाहो फोडत असताना शिवसेना नेते अंतर्गत गटातटाच्या राजकारणात व्यस्त आहेत. राजापूरच्या, पर्यायाने कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हे घातक असून, आता तालुक्यातील सर्व जनतेने या प्रकल्पासाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे आणि सर्व पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यांना साथ दिली पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंदुभाई देशपांडे आणि काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये यांनी केले.
ठळक मुद्देरिफायनरीसाठी जनतेचा टाहो अन् शिवसेनेचे नेते राजकारणातराजापुरातील ४५ संस्थांची मिळून समन्वय समिती स्थापन