अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे अडीच तास कवी केशवसुत स्मारकात घालवताना विद्यार्थ्यांनाही कविता स्फुरल्या आणि त्या कवितांचे त्यांनी लिखाणही केले. या कवितांचे वाचन गुरूवार, २७ रोजी प्रशालेत करण्यात आले.आजच्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांचे शिक्षण झाले पाहिजे. यासाठीच विविध शिबिरे, व्यक्तिपरिचय, क्षेत्रभेट यासारखे उपक्रम गुरुकुलकडून सातत्याने राबविले जातात. याच संकल्पनेमधून गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या स्मारकाला भेट दिली.
यावेळी अतिशय निसर्गरम्य वातावरणातील केशवसुतांचे जन्मघर, त्यांच्या कविता मुलांनी वाचल्या व समजून घेतल्या. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे, याचा अनुभव यानिमित्ताने मुलांना घेता आला. विशेष म्हणजे रत्नागिरीपासून मालगुंडपर्यंत व पुन्हा रत्नागिरीपर्यंत हा संपूर्ण प्रवास मुलांनी सायकलने पूर्ण केला.गुरूकुलचे किरण सनगरे, गौरव पिलणकर, विनिता मयेकर आणि प्रियांका सुर्वे या शिक्षकांसमवेत सातवी आणि आठवीतील २६ विद्यार्थ्यांचा चमू रत्नागिरीतून सकाळी ७.३० वाजता निघाला. मालगुंड येथे ११ वाजत्या पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नावली दिली होती. त्या प्रश्नावलीतून विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास सांगण्यात आले.
या प्रश्नावलीच्या अनुषंगाने त्यांचे घर, त्यांचा जीवनप्रवास, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यातून तुम्हाला आवडलेली कविता, कवितेतून काय सांगायचा प्रयत्न केला आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण सायंकाळी ५ वाजता पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांना होते.
रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक आहे. त्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या कविता वाचाव्यात, त्यांचा अभ्यास करावा, या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती. पुस्तकाबाहेर जाऊन मुलांनी वेगळा विचार करावा, हा यामागचा उद्देश होता.- किरण सनगरे, शिक्षक