चिपळूण : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन संसर्ग रोखण्यासाठी पाेलिसांकडून गाव दत्तक घेण्यात येत आहेत. या याेजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील मालघर गाव पोलीस स्थानकाकडून दत्तक घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी भेट दिली.
सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी त्या-त्या गावात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील मालघर गावची जबाबदारी येथील पोलिसांनी घेतली आहे. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, अतुल ठाकूर, शिंदे यांनी सरपंच सुनील वाजे तसेच पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा करून कोरोना संसर्ग कसा रोखता येईल या संदर्भात मार्गदर्शन करून नियोजन करण्यास सांगितले आहे.
याविषयीचे नियोजन ग्रामपंचायतीतर्फे सुरू असताना पोलीस अधीक्षक गर्ग यांनी बुधवारी सायंकाळी मालघर येथे भेट दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि शासनाकडून जे काही सहकार्य लागेल ते पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर पुढील काही दिवस राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना मालघर मधील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी सरपंच सुनील वाजे यांनी केले.
........................................
चिपळूण तालुक्यातील मालघर येथे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, देवेंद्र पोळ यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.