खेड : गणेशोत्सव कालावधीत तालुक्यात चाकरमानी येणार आहेत. पोलीस पाटील हे प्रशासन व ग्रामीण जनतेतील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहून प्रत्येक घटनेची नोंद करावी, अशी सूचना खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील पोलीस पाटलांच्या सभेत त्यांनी मार्गदर्शन केले.
शशिकांत काशिद म्हणाले की, १० सप्टेंबर २०२१पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशावेळी चाकरमानी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावात येणार आहेत. उत्सव काळात गावातील शांततेचे वातावरण बिघडणार नाही, राजकीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. या कालावधीत गावागावातून घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता, त्यांची नोंद ठेवत त्याची माहिती वेळोवेळी पोलीस स्थानकात द्यावी म्हणजे गंभीर घटनांवर वेळीच अटकाव करणे सोपे होईल. गावात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे, असे काशिद यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनीही मार्गदर्शन केले.