हर्दखळे स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:19+5:302021-07-31T04:32:19+5:30
लांजा : तालुक्यातील हर्दखळे येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला गेले वर्षभर लेखी निवेदने देण्यात आली आहेत. तरीही प्रशासन कानाडोळा करीत ...
लांजा : तालुक्यातील हर्दखळे येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला गेले वर्षभर लेखी निवेदने देण्यात आली आहेत. तरीही प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे मनसेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत गुरव यांनी सांगितले. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हर्दखळे येथील स्मशानभूमीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मृतदेह जाळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. याबाबत संबंधित प्रशासनाला लेखी पत्र व निवेदनेही देण्यात आली हाेती. माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून लेखी पत्र जिल्हाधिकारी यांना देऊन गावातील हर्दखळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली होती. परंतु, त्या पत्रालाही प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.
याबाबत हर्दखळे गावचे सुपुत्र लांजा तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत गुरव यांनी स्मशानभूमीचे काम पावसाळ्यानंतर न झाल्यास प्रशासनाच्या विरुद्ध तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
-----------------------
लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.