आंजणारी पूल ते निवसर मळा येथील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:33+5:302021-06-29T04:21:33+5:30
लांजा : दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या आंजणारी ...
लांजा : दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या आंजणारी पूल ते निवसर मळा रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवसर मळा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून आंजणारी पूल ते निवसर मळा या रस्त्यावर शासनाने १९ लाख २० हजार रुपये खर्च करून दोन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण केले. मात्र, त्यानंतर पडलेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ता खचल्याने सध्या या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. जोरदार पावसाच्या पाण्याने रस्ता वाहून जाऊ शकतो तसेच मोठमोठी खडी उचकटून वर आल्यास नागरिकांना चालणेही अवघड होऊन बसणार आहे. या रस्त्याबाबत निवसर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. हा रस्ता रेल्वे स्थानकाला जोडण्यात आल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रेल्वे प्रवासी व वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. शासनाने १९ लाख २० हजार ८९० रुपयांची निविदा काढली होती. या रस्त्याच्या कामाचा ठेका यादव नामक ठेकेदाराने घेऊन मार्च महिन्यामध्ये रस्त्याचे काम घाईगडबडीत पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पहिल्याच पावसात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या निवेदनावर मुस्लिम जामातचे अध्यक्ष अख्तर मुकरी, अशपाक पावसकर, अल्ताफ पावसकर यांच्यासह ४२ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.
-------------------------------
लांजा तालुक्यातील आंजणारी पूल ते निवसर मळा येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता वाहतुकीला धाेकादायक बनला आहे.