रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथे झाली. या बैठकीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या चार राज्यातील प्रतिनिधी तसेच कोकण रेल्वेचे सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीत रेल्वे समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती या समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी दिली.कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती, भारतीय रेल्वेची बदललेली धोरणं,कोकण रेल्वे देशात करत असलेले प्रकल्प, चार राज्यांचा भाग भांडवलातील आतापर्यंतचा सहभाग, प्रवासी वाहतूक व माल वाहतुकीने मिळणारे उत्पन्न, नजिकच्या काळात विद्युतीकरण, तसेच मार्ग सुरक्षित करण्यासाठी झालेल्या उपाययोजना याबाबत संजय गुप्ता यांनी माहिती दिली.सचिन वहाळकर यांनी यावेळी पुणे- सावंतवाडी ही गाडी कायमस्वरुपी प्रत्येक वीकएंडला सुरू ठेवण्याची मागणी केली. या गाडीची शिफारस रेल्वेबोर्डाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅसेंजरला संगमेश्वरसाठीचा राखीव डबा पुर्वीप्रमाणे दहा जुलैपासून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वहाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार अनेक ठराव करण्यात आले. त्यानुसार कोरोनापुर्वीचे सर्व हाॅल्टस कायम करण्यात यावेत, बांद्रा टर्मिनस किंवा वसई येथून रोज एक गाडी सोडण्यात यावी, गणपतीसाठी पनवेल- चिपळूण या मार्गावर डिमयू सुरू करुन त्याच्या पंचवीस फेऱ्या प्रस्तावित करण्याचा निर्णय झाला. गणपती स्पेशल ट्रेन ३०८ प्रस्तावित असून त्या पैकी २०६ गाड्यांचे नोटिफिकेशन जुलैअखेर झाले आहे.वहाळकर यांनी या वेळी गणपती बुकिंगदरम्यान एक मिनीटात सर्व बुकिंग फुल झाल्याचा मुद्दा उपस्थित करून कोकण रेल्वेकडून कोणतीही माहिती स्थानिक माध्यमांमधून प्रवासी वर्गाला न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भविष्यात जनसंपर्क विभागाने याची व इतर वृत्तांची दखल तातडीने घेण्याची सुचना केली. महाराष्ट्र सरकारकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील स्टेशनना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काॅन्क्रीटिकरणासाठी ६५ कोटींची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव वहाळकर यांनी मांडला. वरीष्ठ नागरीकांना दिली जाणारी श्रावण सेवा पुर्ववत केल्याबद्दल रेल्वेप्रशासनाचे आभार मानले.
खासदार धनंजय महाडिक यांनी वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आहे, याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करु, असे सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेवरील छोट्या स्थानकांना भेट देऊन तेथील समस्या सोडवण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे वहाळकर यांनी सांगितले.