कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:49+5:302021-03-24T04:29:49+5:30
रत्नागिरी : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेमध्ये राज्यभरात त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर उमेदवार भरती केली. त्या सर्वांनी कर्तव्यभावनेने ...
रत्नागिरी : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेमध्ये राज्यभरात त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर उमेदवार भरती केली. त्या सर्वांनी कर्तव्यभावनेने काम केलेले आहे. आजही हे कर्मचारी दुसऱ्या लाटेतही काम करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची नोंद शासनदरबारी ज्या प्रमाणात घ्यायला हवी होती, त्या प्रमाणात घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. हे खेदकारक असून महामारीत काम केलेल्या या कर्मचाऱ्यांची शासकीय नोंद करून अद्ययावत यादी जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य चिटणीस श्रीनिवास दळवी, महिला प्रदेश अध्यक्षा ॲड. भाग्यश्री ओझा, राज्य समन्वयक राधिका जोगळेकर, युवा अध्यक्ष नीलेश आखाडे, सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया भारस्वाडकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, तालुकाध्यक्ष आनंद विलणकर आदींनी हे निवेदन ई-मेलद्वारे सादर केले.
ज्या पद्धतीने अनुकंपा तत्त्वावरील व प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी असते, तत्सम पद्धतीने निव्वळ कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात यावी. ज्यायोगे कर्तव्य बजाविलेल्याच उमेदवारांना न्याय मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. भविष्यात या उमेदवारांबाबत काही सकारात्मक निर्णय झाल्यास, खरोखरच काम केलेल्यांनाच न्याय मिळेल, असेही यात म्हटले आहे. अद्ययावत यादी त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना पडताळणीसाठी सूचना फलकावर लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांसाठी समविचारीचा लढा सुरू असून महामारीच्या या दुसऱ्या संकटाचा विचार करून आम्ही शासनाला मदत करण्याचे धोरण अवलंबलेले असल्याचे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.