आबलोली : गुहागर तालुक्यातील काजुर्ली मानवाडी व खडपेवाडी या वाड्यांना जोडणारी डिगोली या पाऊलवाटेवरील सुमारे ८ ते १० विद्युत खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. ते केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ते खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
हायजीन किटचे वाटप
खेड : सॅन्डविक कोरोमंट, लोटे, रत्नागिरी आणि स्फेरुल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील धामणदेवी येथे महिलांना हायजीन किटचे वितरण करण्यात आले. सॅन्डविक कोरोमंट प्रोडक्शन विभाग प्रमुख विक्रम कुलकर्णी व तुषार शिंदे यांच्या हस्ते ते देण्यात आले. या उपक्रमाला गाव पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला.
वनराई बंधारा बांधला
रत्नागिरी : गोळप गावातील जनसेवा सामाजिक मंडळाने वनराई बंधारा बांधून संभाव्य पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ५ वर्षांपासून पाणी साठवणीबाबत जनजागृती, जलसाक्षरता मोहीम लोकसहभागातून सुरू आहे. पाणीटंचाईचे चित्र बदलण्यासाठी या मंडळाने लोकसहभागातून बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मास्क वाटप
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे क्रमांक १ शाळेत मुलांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप चेंबूरचे शिवसेना उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सृष्टी शिंदे, संजय कदम, जयवंत खरात, समीर मोरे, विजय शिंदे, प्रकाश शिंदे, मयाराम पाटील, विनया देवरुखकर, रेवती घाग, उमा पावसकर, पल्लवी नळकांडे आदी उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिन साजरा
चिपळूण : येथील संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्षयरोगाची माहिती, क्षयरोग कसा होतो, त्यावरील उपचार तसेच क्षयरोगाचे निदान कसे केले जाते याविषयी माहिती सांगितली. या वेळी प्रा. संध्याराणी नांदगावकर, आदिती पटवर्धन, निकिता झगडे, मयूरी शिगवण आदी उपस्थित होते.
गढी परिसरात स्वच्छता मोहीम
लांजा : शिवगंध प्रतिष्ठान, दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साटवलीतील शिवकालीन गढी परिसरात संवर्धन, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहीम यशस्वी झाल्याने शिवकालीन साटवली गढीने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने शिवकालीन गढीची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत होती.
शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावातील शिमगोत्सव प्रथा, परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्याबाबत आंगवली ग्रामस्थांमध्ये देवस्थान पदाधिकाऱ्यांमार्फत सातत्याने जनजागृती करण्यात आली होती.
सभापतींकडून आरोग्य केंद्राची पाहणी
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेची पंचायत समितीचे सभापती जया माने यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. केंद्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधीच्या मागणीचा प्रस्ताव तत्काळ रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचा निर्णय सभापती माने यांनी घेतला आहे.
राजापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
राजापूर : कोरोना रुग्णांच्या तालुक्यातील संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे. धारतळे येथे ३ तर करक येथे २ रुग्ण सापडले. या नव्या पाच रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४२७ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची ३५ झाली आहे. तालुक्यातील एकूण २३६ गावांपैकी ७० गावांत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
सेवानिवृत्त समितीला देणगी
रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका उषा भालचंद्र भाटवडेकर यांनी सेवानिवृत्तांच्या जनसेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी ७,५०० रुपयांची देणगी देण्यात आली. या समितीने खालची आळी येथील मुरलीधर मंदिरात विभागीय सभेचे आयोजन केले होते. या वेळी देणगीदारांचे आभार मानण्यात आले.