राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प हा राजापुरात होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला रत्नागिरी ग्रीन रिफायनरी असे नाव न देता राजापूर रिफायनरी प्रकल्प असे नाव द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी केली आहे. याबाबत रिफायनरी कंपनीशी बाकाळकर यांनी पत्रव्यवहार केला आहे.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या साडेचार लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काॅंग्रेसने स्वागत करत सकारात्मक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजापूर दौऱ्यात या प्रकल्पासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल, अशी स्पष्ट भूमिका मांडताना विकासासाठी हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे जाहीर केले होते. देश आणि राज्य पातळीवर कायमच विकासाची संकल्पना ठेवून काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाने रिफायनरी प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका निश्चितच कोकण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटत आहेत. खास करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून आणि प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांकडून काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
या प्रकल्पाचे नाव जे रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प असे ठेवण्यात आले आहे ते तसे न ठेवता ते बदलून आता या प्रकल्पाला राजापूर ग्रीन रिफायनरी प्रकल्प असे नाव द्यावे अशी मागणी सुभाष बाकाळकर यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे राजापूर तालुक्याचेच नाही तर रत्नागिरी जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. आर्थिक, सामाजिक विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. राजापूर तालुक्यात हा प्रकल्प होत असल्याने राजापूरचे नावही मोठे होणार असल्याचे बाकाळकर यांनी सांगितले.