रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील डी - मार्टजवळील भाजीविक्रेत्यांनी कोरोनाची चाचणी न केल्याने तसेच काहींकडे दहा दिवसापू्र्वी चाचणी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.कोरोनामुळे तालुक्यातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. तथापि अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, दूध व फळे यांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, दूध व फळे विक्रेते यांच्याकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे. कुवारबाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजता तहसीलदार शशिकांत जाधव यांनी भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली.
यावेळी काहीजण कोरोना चाचणी न केल्याचे आणि काही जणांचे १० दिवसापूर्वी कोरोना चाचणी केल्याचे निदर्शानास आले. त्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत १२ हजार रुपयाची वसुली केली. याच ठिकाणी भाजी खरेदीस आलेल्या एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीवरही १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.भाजीपाला विक्रीस प्रतिबंधया ठिकाणी भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन दि. १ मे पासून कुवारबाव येथे भाजीपाला विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे. येथील भाजीपाला विक्रेत्यांनी फक्त घरपोच सेवा देण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी दिलेले आहेत.