खरे तर त्या तरुणीच्या ठिकाणी अन्य कोणीही असते, तरीही हे घडलेच असते. तेव्हा या भीषण घटनेची दखल चिपळूणकरांना घ्यावीच लागणार आहे. आज एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी या घटनेत नाहक भरडली गेली. उद्या आणखी कोणावरही वेळ येऊ शकते. म्हणून प्रत्येकाने जागे राहिले पाहिजे. या घटनेनंतर शिक्षण, नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या मुली व त्यांचे पालक धास्तावले आहेत. शिवाय घराबाहेर पडणाऱ्या महिलाही असुरक्षिततेच्या दडपणाखाली वावरत आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुली नोकरी, शिक्षणानिमित्ताने शहरात येतात. सायंकाळी उशिरा घराकडे निघतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. तेव्हा या प्रसंगातून सावरण्यासाठी चिपळूणकर म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. सर्वप्रथम संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. दहा वर्षे ही मागणी केली जात आहे. परंतु, त्या मागणीवर नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जराही गांभीर्याने विचार केलेला नाही. नगर परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीतील जाहीरनाम्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा मांडला जातो. मात्र, निवडणूक संपली की, त्या कॅमेऱ्याचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा जणू विसर पडतो. त्याची आठवण आता नागरिकांनीच करून द्यायला हवी. म्हणून म्हणतो प्रत्येकाने पुढे यायला हवे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रसंग घडला, त्याठिकाणी कायम अंधार असतो. भोगाळे हा परिसर बाजारपेठेतील असला, तरी तेथे पथदीप मोजकेच आहेत. त्या अंधाराचाच फायदा नराधमाने उचलला. अशाच पद्धतीचा अंधार चिपळूण शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यावर कायम असतो. गुहागर बायपास रस्ता, गोवळकोट रोड, पेठमाप, शंकरवाडी, मुरादपूर रस्ता या भागात कायम अंधार असतो. अशा ठिकाणचा अंधार वेळीच दूर करायला हवा. शिवाय पोलिसांची गस्त केवळ रात्रीची नव्हे, तर आता सायंकाळच्या वेळीही ठेवायला हवी. तरच अशा प्रवृत्तीला आळा बसेल. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.
- संदीप बांद्रे