रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुरळक सर वगळता उन्हे पडू लागली आहे. गेल्या २४ तासात एकूण १३१.८० (सरासरी १४.६४) मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून जिल्ह्यात पडझडीच्या घटना मात्र सुरूच आहेत. काही भागात घरे, रस्ते व डोंगराला भेगा पडल्या आहेत.
रविवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीही आता उन्हं पडायला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही घरे, गोठे यांचे नुकसान होत आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पावसामुळे मंडणगड तालुक्यात पडवे येथे रामभाऊ सुबान यांच्या घराचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात बोरथळ येथील धाडवे यांच्या घराची भिंत पडून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बुरोंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे ३२ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे. धान्नखेली येथील गोविंद यशवंत पागर यांचे गोठ्याचे पूर्णत: यांचे झाले आहे.
चिपळूण तालुक्यात तिवरे येथे सिमेंट पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. वाहतूक बंद आहे तेथील घरांना तडे व डोंगराला भेगा गेल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यात डिंगणी येथील वसंत राऊत यांच्या गोठ्याचे २ हजार रुपये नुकसान झाले आहे. कळंबस्ते येथे रस्त्याला भेगा पडल्या आहेत.