रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शुक्रवारी दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढतो की काय, अशी चिंता व्यक्त हाेत आहे.
२१ रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने चिपळूण आणि खेडमध्ये प्रलयंकारी परिस्थिती निर्माण केली. राजापूर, रत्नागिरी या दोन शहरांसह तालुक्यांमधील काही गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर पावसाने हळूहळू विश्रांती घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सूर्यदर्शनही घडत होते.
पावसाने आठवडाभर हळूहळू विश्रांती घेण्यास सुरुवात केली असतानाच शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा पावसाची चिन्हे दिसू लागली. दुपारपर्यंत मळभ दाटून आलेले होते. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळेल, असे वाटत होते.
हवामान खात्याकडून २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी पावसाची चिन्हे दिसू लागल्याने पाऊस पुन्हा जोर धरणार असे वाटत होते. मात्र, दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते.
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नाही. पावसाच्या विश्रांतीने जिल्हा प्रशासनाने चिपळूण आणि खेड येथील पूर परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून मदतकार्य वेगात सुरू आहे.