रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 08:49 PM2018-03-14T20:49:50+5:302018-03-14T20:56:24+5:30
वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.
लांजा/राजापूर : वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता ढगांच्या गडगडाटसह अवकाळी गाराचा पाऊस लांजा तालुक्यातील पश्चिम भागात कोसळला. तसेच लांजा शहरातदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास २० मिनिटे पाऊस कोसळत होता. जमिनीवर पडलेल्या गारा जमा करण्यासाठी बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटत होती.
राजापूर तालुक्यातील पूर्व भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाचल परिसरात कोसळलेल्या सरींमुळे अनेकांची धावपळ उडाली होती. बाजारात आलेल्या नागरिकांचीदेखील धांदल उडाली होती. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे काजू आंबा बागायतदार यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. बुधवारी पडलेल्या पावसामुळे आंबा डागाळू शकतो. काजूची देखील हीच अवस्था झाल्याने सर्वसामान्य शेतक-यांवर आसमानी संकट ओढवले आहे .