पाचल : पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी पुणे-मुंबईची वाट न धरता गावातच त्याने छोटा व्यवसाय सांभाळून शेती करण्यास सुरुवात केली. काेराेनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपून त्याने लसीकरणाच्या माेहिमेबाबत जनजागृतीची सुरू केली. वाडी-वस्त्यांवर जाऊन लाेकप्रबाेधनाचे काम करण्याबराेबरच लसीकरण सुरळीत पार पडण्यासाठी तालुक्यातील रायपाटण येथील कुणाल विलास गांगण याने मदत कार्य सुरू केले आहे.
त्यांचे वडील राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक व रायपाटण गावचे माजी सरपंच होते. त्यामुळे समाजसेवेचा वारसा व बालकडू त्याला घरातूनच मिळालेले असल्याने तो आपला बराचसा वेळ समाजसेवेसाठीच देतो. सद्यःस्थितीत लसीचा तुटवडा असल्याने लस आल्यांनतर लसीकरण केंद्रावर लोकांची झुंबड उडत आहे. काही ठिकाणी वाद-विवाद होत असून, काही ठिकाणी लोकांनी लसीकरण केंद्र बंद पाडल्याने पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या लसीचे वितरण योग्य पद्धतीने होऊन याचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी तो जातीनीशी लसीकरण केंद्रावर उपस्थित असतो.
रायपाटण ग्रामीण रुग्णालय हे पाचल पूर्व भागातील मोठे लसीकरण केंद्र आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. यावेळी कुणाल गांगण पहाटे ४ वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रावर हजर राहून लोकांना नंबराप्रमाणे रांगेत खुर्चीवर बसवून आलेल्या लोकांच्या नावाची यादी तयार करून ती डाॅक्टरांकडे देतो. त्यामुळे केंद्रावर गर्दी, गोंधळ न होता लसीकरणाची प्रक्रिया पार पडत आहे. लसीकरणासाठी आलेल्या लोकांची बसण्याची, पाण्याची, प्रसंगी नास्त्याची सोय ही करतो. यासाठी तो स्वतः पदरमोड करून करून सामाजिक बांधिलकेतून हे काम करीत आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
---------------------
आपण या समाजाचे काही देणं लागतो, या भावनेतून प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा म्हणून काम केल्यास व शासन नियमांचे पालन केल्यास कोरोनाची लढाई आपण १०० टक्के जिंकू.
- कुणाल गांगण