राजापुरात पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 11:27 AM2021-07-12T11:27:29+5:302021-07-12T11:29:14+5:30
Rain Ratnagiri Rajapru : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्यांदा शहराला वेढा घातला आहे.
विनोद पवार
राजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्यांदा शहराला वेढा घातला आहे.
रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्या पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधारा पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असून, शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.
राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी बेपत्ता असल्यास तत्काळ माहिती पोलीस स्थानकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पुराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर, उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.
शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठेतील अनेक दुकानंमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने सावध झालेल्या व्यापार्यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापार्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.
शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.