चिपळूण : महापुरात एस. टी. महामंडळाची रोख रक्कम तब्बल नऊ तास एस. टी.च्या टपावर बसून सुखरुप सांभाळण्याचे धाडसाचे व प्रामाणिकपणाचे काम चिपळूण बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी केले आहे. राज्याचा परिवहन मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजेशिर्के यांचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी येथे केले.
चिपळूण बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांचा पालकमंत्री परब यांच्या हस्ते चिपळूण येथे गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संकटावेळी प्रत्येक माणूस प्रथम आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो, परंतु यावेळी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी यावेळी आभार मानले. हे कर्मचारी एस. टी. महामंडळाचे वैभव आहेत. सार्वजनिक मालमत्ता वाचविण्याचे काम एस. टी.च्या कर्मचाऱ्यांनी केले. या कामगिरीमुळे एस. टी. महामंडळाचा नावलौकिक देशभरात पोहोचला आहे. त्यामुळे या विभागाचा मंत्री म्हणून आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.