रत्नागिरी : गेल्या वर्षीपासून रत्नागिरीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मागे लागलो होतो. येथील कृषी प्रदर्शन देखणं, परिपूर्ण असून, प्रत्येक स्टॉल पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीचे प्रदर्शन अव्वल ठरले आहे. हे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी व विकसनशीलतेकडे नेणारे असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते. यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, बंड्या साळवी, शिक्षण सभापती दीपक नागले, बाबू म्हाप, परशुराम कदम, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.विदर्भ, मराठवाड्याने बागायतीकडे पाठ फिरवली असली तरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी बागायती फुलवली आहे. यामध्ये माचाळ येथील स्ट्रॉबेरी लागवड कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात दूध पंढरी उभारण्याची सूचना करून शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन व सरकार नेहमीच उभे राहील, असे आश्वासन दिले. तुकडे पद्धतीला छेद देऊन गटशेती हा चांगला पर्याय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ६०० एकरवर गटशेतीचा केलेला प्रयोग कौतुकास्पद ठरला आहे. चांदा ते बांदामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्याचे मागणी करून आता शेतीमध्ये ठराविक जिल्ह्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. रत्नागिरीचे शेतकरीदेखील प्रयोगशील असून, त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन विभागीय कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले तर जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमात खानू (ता. लांजा) गावचे संदीप कांबळे यांच्या शोषखड्ड्याच्या प्रतिकृती(मॉडेल)चे अनावरण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीचे कृषी प्रदर्शन अव्वल- खासदार विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 5:05 PM