रत्नागिरी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाईम बोर्डाने पाऊल उचलले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनारा सेफ्टी झोन करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट क्वाटिक म्युचर असोसिएशनचे सहकार्य घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अॅक्वाटिकची टीम गणपतीपुळेची पाहणी करणार आहे.कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ घातली आहे. त्यामुळे याठिकाणी येणारा पर्यटक समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी त्याचठिकाणी राहण्याचे पसंत करतो. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. तर समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडणाऱ्या घटनादेखील घडत आहेत.त्यामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी धोकादायक ठरला आहे.
डिसेंबरअखेरीस पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांनी गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांना पसंती दिली होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी गर्दी झाली होती. गणपतीपुळेचा किनारा पोहणाऱ्यांसाठी धोकादायक बनला असून, तेथे सुरक्षित उपाययोजना करणे आवश्यक आहे.गेली दोन वर्षे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. किनाऱ्यावर जीवरक्षकही नेमण्यात आले, परंतु पर्यटकांची संख्या अधिक आणि जीवरक्षक मोजकेच अशी स्थिती आहे. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन गणपतीपुळे सेफ्टी झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
चिवला (सिंधुदुर्ग) बीच येथे हा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट अॅक्वाटिक अॅम्युचर असोसिएशनची मदत घेण्यात आली आहे. त्या बीचवर धोकादायक झोन तयार करून तेथे पोहण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.गणपतीपुळेचा भाग दोन डोंगरांमध्ये असल्याने भरती-ओहोटीच्या विशिष्ट वेळी तेथे चाळ निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक अडकला तर तो बुडतो. याच बाबींचा अभ्यास करून तेथे पोहण्यास प्रतिबंध झोन तयार केले जाणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे कमी आहेत. एप्रिल, मे महिन्यातील पर्यटन हंगामात पर्यटक वाढले, तर त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.