रत्नागिरी : लांजातील खोरनिनको धरणात सिमेंट पिशव्यांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 01:17 PM2018-02-10T13:17:44+5:302018-02-10T13:17:53+5:30
खोरनिनको धरणाच्या पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा प्रचंड खच असल्याचे समोर आले आहे
लांजा : खोरनिनको धरणाच्या पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा प्रचंड खच असल्याचे समोर आले आहे. यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन याच पाण्याचा परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे येणाºया पर्यटकांचाही सिमेंटच्या पिशव्यांचा खच पाहून हिरमोड होत आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील प्रसिध्द व विस्तृत अशा मुचकुंदी नदीवर खोरनिनको येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या प्रचंड पाणीसाठवण क्षमतेमुळे हे धरण बांधल्यानंतर लगेचच पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. पावसाळ्यात येथे पावसाळी पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. हिवाळ्यातही या परिसरात असणाऱ्या बल्लाळ गणेश देवस्थान आणि शिवकालीन गुहा पाहण्यासाठी येणारे पर्यटक या धरणाला आवर्जून भेट देत असतात. पर्यटकांमध्ये पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले खोरनिनको धरण सध्या मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात असलेल्या सिमेंटच्या पिशव्यांमुळे कुप्रसिद्ध ठरत आहे.
पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाºया या धरणाची पाणीपातळी सध्या खालावली आहे. पाणीपातळी खालावल्याने धरणाच्या एका बाजुला असलेल्या सिमेंटच्या पिशव्यांचा खच दिसू लागला आहे. काही पिशव्या अजूनही पाणी साठ्यात दिसून येत आहेत. प्रचंड प्रमाणात असलेल्या या सिमेंटच्या पिशव्यांमुळे पाणी साठ्यातील पाणी प्रदूषित होत आहे. हेच प्रदूषित पाणी नदीत सोडले जाऊन ते पाणी परिसरातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
धरणाचा विस्तीर्ण पसरलेला पाणीसाठा डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात. विस्तीर्ण पाणी साठ्यासाठीच हे धरण प्रसिध्द आहे. याच विस्तीर्ण पसरलेल्या पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात ठिकठिकाणी सिमेंटच्या पिशव्यांचा खच दिसत असल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
प्रदूषणाचा विळखा
या पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखायचे असेल तर या पिशव्या हटविणे गरजेचे असून, पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा खच पाहून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याने पर्यटक या धरणाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या पिशव्या हटविण्याची मागणी होत आहे. या पिशव्या वेळीच हटविण्यात आल्या नाहीत तर हे धरणाला प्रदूषणाचा विळखा बसण्याची शक्यता आहे.