संतोष पोटफोडेसाखरपा : अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. आधार दोनच होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन, त्याला शेजाऱ्यांनी दिलेली जोड आणि डोक्यावरचे छप्पर. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने आज त्यातला एक आधार निखळला. तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्हा एकदा निराधार झाल्या.संगमेश्वर तालुक्यातील काजळी नदीच्या किनारी वसलेल्या भडकंबा गावातील पेठवाडीतील विजया उद्धव पवार यांचे राहाते घर मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अवघ्या दोन तासातच होत्याचं नव्हते झाले.विजया पवार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पती उद्धव पवार यांचे अठरा वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या घरात एकट्याच राहात होत्या. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांना शेजारचे लोक मदत करीत असत. जेवण, डॉक्टरचा खर्च सर्व शेजारीच करत असत.
थोड्याफार प्रमाणात मोठा खर्च आला तर त्यांचा पुतण्या निखील पवार करीत असे. भडकंबा पेठेतील ग्रामस्थांनी आगीची घटना समजताच पवार यांच्या घराकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनाने आग विझविण्यास मदत केली.
दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, तेव्हा बुधवारी पहाटे साडेतीन वाजले होते. तोपर्यंत त्यांचा पूर्ण संसार जळून खाक झाला. अर्थात संसाराबरोबरच त्यांचे हक्काचे छप्पर काही क्षणातच हरपले असले तरी भडकंबा पेठवाडीतील शेजारी आजही आपुलकीने त्यांच्या मदतीसाठी धडपडत आहेत... माणुसकीची साक्ष देत...!