रत्नागिरी : बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून घेतलेल्या धड्यांच्या आधारावर बालनाट्याचे स्वत: लेखन करून, दिग्दर्शन करून त्याचे सादरीकरण करण्याचा अनोखा उपक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे घेण्यात आला.
यावेळी मुलांनी सादर केलेल्या बालनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहात रंगलेल्या कलारंग या कार्यक्रमातून बालकलाकारांनी धमाल उडवून दिली.कार्यक्रमाची सुरुवात शिबिरात बसविण्यात आलेल्या नांदीने झाली. त्यानंतर कार्यक्रमात नाटिका विळखा, प्लास्टिक टाळा नाहीतर मरा आणि पाणी म्हणजे जीवन या तीन नाटिकांचे सादरीकरण झाल्यानंतर प्रार्थना सादर झाली.
त्यानंतर शिबिरार्थींना प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष राहुल पंडित, ज्येष्ठ नगरसेविका शिल्पा सुर्वे, मुंबईतील नेपथ्यकार व प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर, नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य श्रीनिवास जरंडीकर, नाट्यपरिषद, रत्नागिरी शाखेचे उपाध्यक्ष राजकिरण दळी, नियामक मंडळाचे सदस्य आणि नाट्यपरिषद, रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, खजिनदार सतीश दळी, कार्यवाह आसावरी शेट्ये यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले.शिबिर यशस्वीतेसाठी नाट्य परिषदेच्या आसावरी शेट्ये, अविष्कार शाळेच्या शिक्षिका आणि लेखिका तेजा मुळ्ये आणि अविष्कार शाळेचे शिक्षक दीप्तेश पाटील, रत्नागिरीतील दिग्दर्शक अप्पा रणभिसे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य व नगरसेवक प्रशांत साळुंखे, शाम मगदूम, मनोहर जोशी, अनिकेत गानू, सनातन रेडीज, दादा वणजू, राजेंद्र घाग, प्रुफुल्ल घाग, दादा लोगडे, तसेच रत्नागिरीतील रंगकर्मी मिताली भिडे, रसिक घाग, मंगेश मोरे, अभिजीत भालेकर, विनायक आपकरे यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन निलीमा इंदुलकर यांनी केले तर प्रास्ताविक अनिल दांडेकर यांनी केले. सुनील बेंडखळे यांनी आभार मानले.