रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:31 PM2019-12-03T13:31:36+5:302019-12-03T13:31:58+5:30
इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणूक साठी काही काळापूर्वी स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीशी काँग्रेसने नाते तोडले आहे. रत्नागिरीनगराध्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ५ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विजय भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली.
शहर विकास आघाडीत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारता काही कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी शहर विकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस होता. आता काँग्रेस शहर विकास आघाडीत नाही. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत त्या पक्षांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास व चर्चा झाल्यास पक्ष नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय होईल असेही भोसले म्हणाले.
राज्यात विकास आघाडीचे सरकार आल्याने इतर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवण्यात येत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवला जात आहे. त्यामुळे रत्नागिरीत नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस इतर पक्षांना सोबत घेणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.