रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ६ कोरोनाबाधित, रुग्णांची एकूण संख्या ९२
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:36 PM2020-05-17T22:36:14+5:302020-05-17T22:36:25+5:30
- दापोलीतील पाच, संगमेश्वरातील एकाचा समावेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी सायंकाळी उशिराने आणखीन वाढ झाली. मिरज येथे पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ५ दापोली तालुक्यातील तर १ संगमेश्वर तालुक्यातील रुग्णांचा समावेश असून, रुग्णांमध्ये ४ महिला व २ पुरुष आहेत. रविवारी आलेल्या अहवालांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ९२ झाली आहे.
जिल्ह्यातून मिरज येथे पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सकाळपासून २७० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील २६४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी सकाळपासून काहीसा दिलासा मिळत असतानाच सायंकाळी मात्र ६ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने रत्नागिरीकरांमध्ये धडकी भरली आहे. नव्याने आढळलेले सहाही रुग्ण मुंबईतून आलेले आहेत. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावातील एकाचा समावेश आहे. त्याला खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. तर उर्वरीत ५ दापोली तालुक्यातील आहेत. त्यामध्ये चार कोंड्ये शिवगण येथील असून, १ कोळथर कोंड येथील आहेत.