मनोज मुळ्येरत्नागिरी : उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. त्यामुळेच नाताळ आणि वर्षअखेरीच्या मुहुर्तासाठी अनेक ठिकाणी हॉटेल्स फुल्ल होऊ लागली आहेत.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यातील हिरवाई अगदी हिवाळाभर कायम असते. नद्यांचे पाणी कमी-अधिक असले तरी प्रवाही असते. अजूनही सिमेंटची फार जंगले उभी राहिली नसल्याने थंडावा चांगलाच जाणवतो. त्यात नाताळच्या काळात गोव्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षात नाताळ आणि वर्षअखेरच्या हंगामात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.
२५ ते ३१ डिसेंबर या काळात हॉटेल्स फुल्ल होतात, हा अनुभव गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. यंदाही रत्नागिरी, गुहागर, दापोली या समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये अनेक हॉटेल्स फुल्ल झाली आहेत.पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. आंबा, काजूची कलमे मोहोरलेली असतात आणि मोहोरांचा दरवळ मोहून टाकतो. मग आता वाट पाहू नका. तुमची पावलंही वळवा, कोकणाच्या दिशेने.... मोहोराचा दरवळ आणि उसळत्या लाटा तुमची वाट पाहत आहेत.