रत्नागिरी : पर्यटकांना मिळणार कोकणच्या वास्तव्याचा आनंद, गणपतीपुळेत एप्रिलदरम्याने सुविधा उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 01:39 PM2018-02-10T13:39:43+5:302018-02-10T13:40:06+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गणपतीपुळे येथे बांबूच्या २५ घरांची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे
रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गणपतीपुळे येथे बांबूच्या २५ घरांची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या १५ बांबूची १५ घरे तयार झाली असून, येत्या एप्रिलपर्यंत हे सर्व घरे पर्यटकांसाठी सुरू करण्यात येतील, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.
पर्यटनवाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम. टी. डी. सी) माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तंबू निवासाद्वारे पर्यटकांच्या राहण्याची सोय करून दिली जात आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातील सागरी किनाऱ्यांकडे आकृष्ट होणाऱ्या परदेशी पर्यटकांनी काही काळ येथे वास्तव्य करावे, यादृष्टीने त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांना जलपर्यटन, जलक्रीडा यांसारखा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा मुख्य हेतू आहे.
पर्यटकांना कोकणच्या सागरी किनाऱ्यांचे आकर्षण आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोकणात पर्यटकांची गर्दी वाढू लागते. न्याहरी निवास योजनेमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपतीपुळे येथे गणेश दर्शनाबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यादृष्टीने पर्यटन विकास महामंडळातर्फे गणपतीपुळे येथे कोकणातील वास्तव्याचा आनंद अनुभवता यावा, यासाठी बांबूच्या निवासाची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात हाऊसबोट सेवा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे तारकर्लीच्या धर्तीवर जिल्ह्यात दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे लवकरच हाऊसबोट सेवा पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार असून यासाठी दोन बोटी महामंडळाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.