दापोली : दापोली शहरातील फॅमिली माळ येथील मेहंदळे एच. पी. गॅस सर्व्हिसचे ऑफिस फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व नवीन रेग्युलेटर चोरल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली शहरातील फॅमिली माळ येथे अपर्णा अशोक मेहंदळे या वितरकांचे एच पी गॅस सर्व्हिसचे ऑफिस आहे. या ठिकानाहून सिलेंडरचा सप्लाय व आर्थिक व्यवहार चालविले जातात. रोजची सिलेंडरची रक्कम या ऑफिसमध्ये जमा केली जाते.
3 वाजण्यापूर्वी सिलेंडरची जमा झालेली रक्कम बँकेत जमा केली जाते, मात्र त्यानंतर जमा होणारी रक्कम ऑफिस मध्ये ठेवली जात होती, ही रक्कम दुस-या दिवशी बँकेत जमा केली जायची. 20 रोजी नेहमी प्रमाणे सिलेंडरची जमा झालेली रक्कम फॅमिली माळ येथील ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र बुधवारी रात्री चोरट्याने बाहेरील सेटरचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून आतील तिजोरी फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व सिलेंडरचे रेग्युलेटरची चोरी केली. दापोली शहरातील फॅमिली माळ ही वस्ती गजबजलेली आहे, मात्र या ठिकाणी यापूर्वी सुद्धा सदनिका फोडून चोरट्याने चोरी केली होती. दरवर्षी या भागात चोरी होत असते, परंतु या पूर्वी झालेल्या चोरी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. मेहंदळे गॅस सर्व्हिस सेंटर हे रस्त्याला लागून आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्या लगतचे मेहंदळे यांचे एच. पी. गॅस ऑफिस फोडल्याने चोरटे महितीगार असण्याची शक्यता असून, चोरटे दोन किंवा दोन पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे . दापोली शहरातील मेहंदळे गॅस ऑफिस फोडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून, दापोली पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. मेहंदळे गॅस ऑफिस शेजारी असणारे सगळे फुटेज तपासून पोलीस चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. पोलीसांना चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश येतेय का ? पुढील तपासातून निष्पन्न होणार आहे