शोभना कांबळे रत्नागिरी : शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी दी गिफ्ट ट्री संस्थेतर्फे प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून गोळा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने यासाठी आता सामाजिक वनीकरण विभागानेही सहकार्याचा हात दिला आहे. त्यासाठी शाळांमधील हरित सेनेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सिद्धेश धुळप यांनी दिली.रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी शहरातील दी गिफ्ट ट्री ही संस्था पुढे आली आहे. संस्थेच्या प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या या उपक्रमाद्वारे लागवडीसाठी रोपांचे वाटप केले जाते.
शहरातील नागरिकांनी घरातील कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा प्लास्टिक पिशव्या, तसेच दूध, तेल, पाणी अथवा शीतपेयांच्या बाटल्या संस्थेकडे आणून द्याव्यात. हे दिल्यानंतर त्या बदल्यात एक कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. नागरिकांकडून घेतलेल्या या पिशव्यांचा वापर पुढील पावसाळ्यात रोपे लावण्यासाठी केला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात एक हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. टेलर्सकडे कपडे शिवल्यानंतर कापडाचे अनेक छोटे तुकडे उरलेले असतात. रत्नागिरीतील सर्व कपडे बनविणाऱ्या दुकानांमधून हे तुकडे गोळा करण्यासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे.
यासाठी शिवणकाम करत असलेल्या बचत गटांना कापडाचे हे तुकडे देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या बनवून घेण्याचा मानस आहे, त्यायोगे महिला बचत गटांनाही रोजगार संधी उपलब्ध होईल, असे मत धुळप यांनी व्यक्त केले.प्लास्टिक हा विघटन न होणारा कचरा असून, त्याचे दुष्परिणाम भयानक आहेत. प्लास्टिक पिशवीत अन्न बांधून कचऱ्यांत फेकण्याचे प्रकार मुक्या जनावरांच्या जिवावर बेतत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने प्लास्टिकचा कचरा विखुरलेला असतो. यामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे. धुळप यांच्या दी गिफ्ट ट्री संस्थेच्या नव्या संकल्पनेमुळे स्वच्छतेत भर पडणार आहे.
प्लास्टिक पिशव्या आणून देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने काही स्टॉलधारक, दुकानदार यांचीही मदत घेण्याचा आमच्या संस्थेचा विचार आहे. सध्या हातखंबा येथील अॅग्रो सेल येथे या पिशव्या स्वीकारल्या जात आहेत. लवकरच काही स्टॉलधारकांकडेही या पिशव्या स्वीकारून त्यांना लवकरच कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.- सिद्धेश धुळप