वाशीपाठोपाठ पुण्यातही रत्नागिरी हापूस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:08 PM2020-02-03T12:08:02+5:302020-02-03T12:12:06+5:30
हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.
रत्नागिरी : विविध नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला हापूस तयार झाला असून, वाशी - मुंबई पाठोपाठ पुण्यातही हापूस विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईत पेटीला दहा हजार रूपये तर पुण्यात मात्र सर्वोच्च दर प्राप्त झाला आहे. पाच डझनाच्या पेटीला २१ हजार ५०० रूपये इतका भाव मिळाला आहे.
दापोली, राजापूर येथील आंबा जानेवारी बाजारात आला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील १२ पेट्या तसेच पावस येथील मुकादम यांच्या बागेतील आंबा फेब्रुवारीत मुंबई मार्केटमध्ये विक्रीस पाठविण्यात आला असतानाच आता पुणे मार्केटमध्येही आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून आंबापेटी पुणे मार्केटयार्डात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. गतवर्षी पुणे मार्केट यार्डात डिसेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी दाखल झाला होता. मात्र यावर्षी फेब्रुवारीत आला आहे. यावर्षीच्या हंगामातील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र क्यार, माहा सारखी वादळे, लांबलेला पाऊस यातून वाचलेला आंबा तयार झाला असून, शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी पाठविण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने आंब्याला दर चांगला प्राप्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना दर्जेदार हापूस मात्र मे महिन्यातच उपलब्ध होणार आहे.