रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि तालिमी इम्दादिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्त्री हायस्कूल येथे पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाया ग्रंथमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. ग्रंथ महोत्सवाचे जिल्हा समन्वयक नथुराम देवळेकर यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी व शिक्षकांसाठी ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. डिजीटल युगात एका क्लिकवर माहितीचा खजाना उपलब्ध होत असला तरी ती माहिती ग्रंथातून आलेली असते. त्यामुळे ग्रंथातील माहिती शाश्वत असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती चे सभापती दीपक नागले यांनी ग्रंथ महोत्सव इंटरनेटमुळे वाचनसंस्कृती लोप पावत आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी स्पर्धा परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.