सुभाष कदमचिपळूण : चिपळूण - गुहागर वन परिक्षेत्रात सध्या १५ बॉयलर व कुकरधारक कात इंडस्ट्रिजना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रदूषण होत असून, मानवी जीवनास भविष्यात धोका होऊ शकतो. बॉयलरमुळे मोठ्या प्रमाणावर खैराची कत्तल होत असल्याने भविष्यात खैर वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या पारंपरिक कात व्यवसाय बंद होऊ लागल्याने बॉयलरमुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याबाबत निवळी येथील श्रीराम डिके यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन नियंत्रणाची मागणी केली आहे.कोकणातील स्थानिक शेतकरी सुगीचा हंगाम सुरु झाल्यावर भात कापणीनंतर मोलमजुरीसाठी बाहेर पडतो. या काळात तो कातभट्टीवर मजुरी करुन आपला चरितार्थ चालवतो. या काळात लग्न, आजारपण यासाठी खैराची झाडे विकून गरज भागवतात. कातासाठी कच्चा माल म्हणून खैराचे लाकूड वापरले जाते.
कोकणात नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर खैराची झाडे उगवतात. खैराच्या झाडांची स्वतंत्र लागवड करावी लागत नाही. खैराची झाडे तोडणे, लाकूड सोलणे, वाहतूक करणे, सालपा गोळा करणे, सदर सालपा चुलीवर उकळवून त्याचा रस काढणे व त्यानंतर पुढील कात बनविण्याची प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ लागते. यातून सहा महिने स्थानिकांना रोजगार मिळत असे.आता हा पारंपरिक व्यवसाय बंद होत असून, त्याची जागा बॉयलर व मिक्सरने घेतली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. बॉयलरसाठी मनुष्यबळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा रोजगार गेला. मोठ्या प्रमाणावर मजूर बेरोजगार झाले.बॉयलरमुळे हवेतील प्रदूषण व राखेचे प्रदूषण होते. बॉयलरमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी चुल्ह्यावर पाच मण खैराचे लाकूड उकळविताना १५ ते २० लोकांना काम मिळायचे. महिन्याला साधारण १५० मण लाकूड वापरले जायचे. १५० ते १७५ कातभट्ट्यांचा विचार केला तर दिवसाला तीन ते साडेतीन हजार मजुरांना काम मिळायचे.आता बॉयलरमुळे या मजुरांवर बेकारी आली आहे. बॉयलरमधून उडणारी राख थेट उघड्यावर सोडली जाते. हवेत धूर सोडला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढून वातावरण दूषित होते. निवळी पंचक्रोशीत अनेक बॉयलर असून, शासनाचे नियम धाब्यावर बसवून ते लोकवस्तीत चालविले जातात. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
बॉयलरमध्ये प्रचंड हिट असल्याने भविष्यात एखाद्या बॉयलरचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत लोकांमध्येही उदासिनता आहे, असेही डिके यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. बॉयलरवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्यांचे दुष्परिणाम परिसरातील ग्रामस्थांना भोगावे लागणार आहेत.स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशाराचिपळूण तालुक्यात नोंदणीकृत १४ बॉयलर आहेत. बॉयलरसाठी दिवसाला ५०० मण लाकूड वापरले जाते. म्हणजे एका दिवसाला सुमारे २० टन लाकूड लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर खैराची तोड होऊन पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचे काम सुरू आहे. त्याकडे शासन व वन विभाग सोयीस्कररित्या डोळेझाक करत आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम डिके यांनी केली आहे.
मनोज डिके यांनी लोकवस्तीत सुरु केलेल्या बॉयलरचा श्रीराम डिके यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. याबाबत त्यांनी वन व महसूल विभागाचे सचिव विकास खर्गे यांच्याशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडे योग्य न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशाराही डिके यांनी दिला आहे.