रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जात असल्याने याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील आॅनलाईनचे काम पाहणारे महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सोडून अन्यत्र हे कार्यालय नेण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शासकीय कामे आॅनलाईन करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल इंडिया असा नारा दिल्यानंतर देशातील बहुतांशी कामे आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुशंगाने महाराष्ट्र सरकारने डिजिटल महाराष्ट्र धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व सुविधा नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यासाठी महाआॅनलाईन प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीमार्फत नागरिकांना सर्व सुविधा देण्याचे धोरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली रत्नागिरी जिल्ह्यातदेखील ही सेवा देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यातील सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवले जात आहे.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम असली तरी महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र जिल्ह्याचे ठिकाण सोडून अन्यत्र कार्यरत असल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. हे कार्यालय संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्राच्या उत्तरात म्हटले आहे.
हे कार्यालय संगमेश्वरसारख्या ठिकाणी असल्याने महाआॅनलाईन संदर्भात काही काम असल्यास कोसुंबसारख्या ठिकाणी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच महाआॅनलाईनचे काम पाहणारी व्यक्ती ही रत्नागिरीत १२ नंतर उपलब्ध होत असल्याने सकाळच्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महाआॅनलाईनमार्फत विविध दाखले देण्याचे काम गेले काही महिने सुरू होते. मात्र, या पोर्टलवरून मिळणारे दाखले विलंबाने मिळत असल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी वाट पाहावी लागते. याबाबत महाआॅनलाईनच्या जिल्हा व्यवस्थापकांचे अद्याप दुर्लक्षच होत आहे. महाआॅनलाईनचे काम संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथून चालवले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.