सुभाष कदमचिपळूण : यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस पडला. पाऊस चांगला पडल्याने यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीपासूनच लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर होणारे बदल जाणवल्यामुळे बागायतदार चिंतेत होता. पावसाळ्याचा हंगाम लांबल्यामुळे थंडीचे आगमन उशिरा झाले.
जमिनीवर ताण पडला नाही. उलट थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम झाला. मोहोर उशिरा आल्याने फळधारणाही अडथळ्यात सापडली होती. मोहोर आल्यानंतरही वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मोहोरावर झाला. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे आलेला मोहोरही काहीअंशी गळून पडला. यावर्षी काजू पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.
यावर्षी थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे मोहोर येऊनही फळधारणेस वेळ लागला. या वातावरण बदलामुळे काजूपीक अडचणीत आले. मोहोर आल्यानंतर उष्णता वाढली असती तर फळधारणा झाली असती. परंतु, तसे न घडल्यामुळे काजूपीक घटले आहे.कोकणात हापूस आंबा वर्षाआड पीक देतो. वातावरण बदल व वाढलेल्या थंडीमुळे या पिकावर परिणाम झाला. उष्णता वाढली तर फळगळती होईल, अशी भीती होती आणि ती खरी ठरली. मुळात उशिरा आलेली फळेही गळू लागली आहेत. आंबा व काजू पिकात घट झाली असली तरी कोकम पीक चांगले येईल व उत्पादन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रानमेवाही नजरेआडआंबा, काजू, जांभूळ, रातांबा, फणस ही फळे हंगाम असताना वाढलेली उष्णता, वातावरणातील बदल व अवेळी पाऊस यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. करवंद, तोरणं, अळू, जांभळं यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हा रानमेवाही नजरेआड होत चालला आहे. हा बदल असाच कायम राहिला तर फळांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.